शूटिंग द स्टार्स
- दिलीप कुलकर्णी
वांद्रयाच्या ‘साहित्य-सहवास’ या वसाहतीत व. पु. काळे ‘झपूर्झा’ या इमारतीत राहत होते. एका संध्याकाळी अगदी उशिरा मी त्यांच्याकडे पोहोचलो. येण्यापूर्वी अर्थातच त्यांची संमती घेतली होती. सुमारे २८-२९ वर्षांपूर्वी मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या पोट्रेटचं जे प्रदर्शन मी पुण्यात भरवलं होतं, त्याच्या उद्घाटनासाठीही ‘वपुं’ना मी गळ घातली होती आणि त्या ‘अवघड’क्षणी तीही त्यांनी मान्य केली. काळे यांच्याशी माझी ही प्रथम भेट होती. रात्री उशिरापर्यंत फोटोसेशन सुरू होतं. यथावकाश ते आटोपून मी पुण्याला परतलो.
आता प्रदर्शनाची तयारी सुरू झाली. निमंत्रणं छापली गेली. ती छापण्यापूर्वी ‘वपुं’ना मुद्दाम फोन करून विचारून घेतली. ऐनवेळी विचका नको म्हणून ‘मुंबईहून पुण्यास जाण्या-येण्याच्या खर्चाखेरीज काही मानधनाची अपेक्षा असल्यास सांगा, म्हणजे सर्व रकमेचा चेक तयार ठेवतो.’ असंही फोनवर विचारलं; पण त्यांनी मानधन तर सोडाच, जाण्या-येण्याचाही खर्च घेतला नाही!
प्रदर्शनाचा दिवस उजाडला. मी गडबडीत होतो. शेवटच्या क्षणापर्यंत तयारी सुरू होती. त्या गडबडीत पुण्यात ‘वपु’ कुठं उतरणार आहेत हे विचारायचं मी विसरलो. उद्घाटनाची वेळ संध्याकाळची होती. पाच वाजायला आले; पण वपुंचा पत्ता नाही. इतर लोक हळूहळू जमायला लागले होते.
अखेर त्या गर्दीत वपु दिसले. ते दिवसभर मलाच शोधत होते. माझ्या घरी, ऑफिसमध्ये बर्याच वेळा ते जाऊन आले; पण मी तिसर्याच ठिकाणी प्रदर्शनाच्या तयारीत होतो. प्रदर्शनाचं उद्घाटन अभिनव पद्धतीनं झालं. श्री. भा. रा. भागवत व सौ. लीलावती भागवत या लेखक दांपत्याचा, उद्घाटक लेखक व. पु. काळे यांनी फोटो काढून प्रदर्शन खुले झाल्याचे जाहीर केले.
प्रदर्शन संपले. सुमारे सहा महिन्यांनी वपुंचे मला एक पत्र आले.
‘प्रिय दिलीप,
साहित्यिकांच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आपण आयोजित केलं. त्या निमित्तानं काढलेल्या छायाचित्रांपैकी एखादं छायाचित्र सौजन्य म्हणून आपण मला पाठवाल, ही अपेक्षा. फोटोग्राफी हा महागडा छंद आहे, याची मला जाणीव आहे तेव्हा मोफतची अपेक्षा नाही.
आपण त्यातलं निवडक चांगलं छायाचित्र पाठवावं. योग्य, वाजवी मानधन कळवावं.
- आपला,
- व. पु. काळे
या सहा महिन्यांत अनंत घटना घडल्या होत्या. प्रदर्शनात निवडक शंभर साहित्यिकांची छायाचित्रे लावली होती; त्यात पुण्यातील काही ‘नामांकित’ राहून गेले होते. ती मंडळी नाराज झाली. काही लहान, उगवतीच्या तार्यांची छायाचित्रे लावल्यामुळे काही ज्येष्ठ साहित्यिक नाराज झाले. त्यांच्या पंक्तीला उगवतीच्या तार्यांना बसविले म्हणून! मुंबईहून काही साहित्यिकांनी पत्र वजा नोटिसा पाठवल्या की, प्रदर्शनात आमची छायाचित्रे लावून तुम्ही ‘धंदा’ केला म्हणून. प्रदर्शनात त्यांची छायाचित्रे तुफान खपली, असा त्यांचा समज झाला होता. कुणीतरी असंही लिहिलं होतं की, प्रदर्शनाला तुम्ही प्रवेशमूल्य ठेवलं तेव्हा आमचा ‘हिस्सा’ पाठवा. वास्तविक प्रवेश विनामूल्य होता. एका साहित्यिकानं तर सरळ धमकी दिली की, प्रदर्शनात ज्या आकारात तुम्ही माझं छायाचित्र लावलंत त्या आकारात त्या छायाचित्राच्या दहा प्रती पाठवा, नाहीतर मी तुम्हाला कोर्टात खेचतो.
या पत्रांमुळे, नोटिसीवजा धमक्यांनी मी हैराण झालो होतो. वास्तविक प्रदर्शनाला गर्दी खूप होती. एक दोघांनी ‘प्रदर्शनानंतर फोटो विकत मिळतील का?’ अशी चौकशी केली होती; तीही सहज म्हणून! पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांच्याच फोटोची ते चौकशी करीत होते. प्रदर्शन संपल्यावर एक गिर्हाईक खरंच माझा पत्ता शोधीत आलं, त्यांनी वपुंचा फोटो किती रुपयांना द्याल, असं विचारलं. मी चाळीस रुपये किंमत सांगितली. ते गिर्हाईक म्हणालं,
‘वपु इतके महाग आहेत? थोडी किंमत कमी करता येईल का?’ ‘किंमत कमी होणं एकूण कठीणच दिसतंय’ मी म्हणालो. शेवटी घासाघीस करून तो सौदा तीस रुपयांचा झाला! त्यावेळी एक-दोघे माझ्या ऑफिसमध्ये बसले होते.
संपूर्ण प्रदर्शनाच्या बदल्यात मला तीस रुपये मिळाले! त्यात वपुंचं पत्र आलं, त्यानं मी आणखीनच निराश झालो. वाटलं, मला तीस रुपये त्यांच्या फोटोच्या बदल्यात मिळाले हीही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली असावी. पत्र न उघडताच मी वपुंना किती रॉयल्टी पाठवावी, याचा विचार करीत होतो. पत्रातील मजकूर फारसा भयावह नव्हता; पण मी जरा टरकलो होतो, त्यातील ‘सौजन्य’ या शब्दामुळे! प्रदर्शनाच्या निमित्तानं काढलेल्या छायाचित्रांपैकी एखादं त्यांना हवं होतं, सौजन्याखातर! तेही ‘योग्य’ आणि ‘वाजवी’ मानधन घेऊन!
मला एवढी पत्रं आली होती त्यात फोटोच्या बदल्यात मानधन देऊ करणारं वपुंचं एकमेव पत्र होतं. मी वपुंच्या सर्व छायाचित्रांच्या लहान प्रती तयार केल्या; सोबत एक पत्र जोडलं आणि त्यांना पाठवून दिलं. ते पत्र असं होतं,
आदरणीय वपु,
सा. न.
आपलं पत्र पोहोचलं, त्याप्रमाणे फोटो पाठवित आहे. त्यातलं ‘चांगलं’ छायाचित्र तुम्हीच निवडा आणि मला कळवा, त्याची मोठी कॉपी लगेच पाठवितो. माझ्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कुठल्याही मानधनाची अपेक्षा न ठेवता तुम्ही स्वखर्चानं माझ्याचसाठी पुण्याला आला तेव्हा मी पाठविणार असलेल्या फोटोंचं वेगळं मानधन मला पाठविण्याची आवश्यकता नाही. वपु, या प्रदर्शनाचा मला खूप मन:स्ताप झाला. एखादी गोष्ट आपण आनंद निर्मितीसाठी करतो; पण त्याचा उलटा परिणाम झाला तर मन:स्ताप होतो. खरं तर हे पत्र लिहितानाही माझ्या मनात अनेक आंदोलनं आहेत. अगदी मायन्यापासून! वपु काळेंना ‘प्रिय’ लिहावं की आदरणीय’? ‘स. न.’ लिहावा की ‘सा. न.’? ‘स’ फक्त काना केला की तो ‘सा.’ होतो; पण तो पुढची सगळी भावनाच बदलून टाकतो. जबाबदारीची, वडीलधारीपणाची जाणीव निर्माण करणारा तो ‘काना’ सर्वांनाच आवडतो असं नाही. बघा, तुम्हाला आवडला तर ठेवा तो ‘काना’ नाहीतर सरळ डिलीट करा! हे कागदावरचं डिलीट करणं सोपं असतं; पण कागदाच्याही पलीकडे जिथं अगोदरच ‘स’चा ‘सा’ झालेला असतो तिथे डिलीट करणं अशक्य आहे..’
त्या पत्राला वपुंचं रजिस्टर पत्र आलं. पत्राचा कागद रंगीत होता. कागदाच्या कोपर्यात एक मनुष्य पिस्तुलातून गोळ्या झाडतो आहे, असं चित्र होतं. खाली मजकूर होता सुंदर अक्षरात.
‘प्रिय,
फोटो पोहोचले.
या चित्रातल्या माणसाप्रमाणे तुम्हाला अनेकांना गोळ्या घालाव्याशा वाटल्या असतील नं? फोटोग्राफी हा झपाट्यानं खिसा हलका करणारा छंद! या प्रदर्शनानं छंदाचा फंद झाला. आमच्या लेखक बांधवांनी दिलेल्या अनुभवाबद्दल खेद वाटतो. केवळ मैत्रीच्या भावनेने सोबत पाठविलेल्या भेटीचा स्वीकार करा. तुम्ही पाठविलेले फोटोंचे सर्वच नमुने आवडले. अधिक कुठला आवडला ते भेटीत ठरवू.’
तुमचा,
वपु
त्या पत्रासोबत त्यांनी ३00 रुपयांचा चेक भेटीदाखल पाठविला होता. १९८४ मध्ये ३00 रुपये! पुढे तो भेटीदाखल पाठविलेला चेक मी वपुंना परत पाठविला. सन्मानपूर्वक! सोबत असंही लिहिलं की, ‘तुमच्या पत्रातला तो चेक मला ख्रिसमसच्या आदल्या रात्री येणार्या सांताक्लॉजसारखा वाटला. या सांताक्लॉजचं लहानपणी फार आकर्षण वाटायचं; पण त्या वयात तो कधीच आला नाही. माझ्या चौथ्या का पाचव्या वाढदिवशी मी हट्ट धरला होता की, मला नवे कपडे पाहिजेत म्हणून. आमचे वडील नोकरीनिमित्त फिरतीवर असायचे, त्यावेळी माझी आजी आमच्याकडे असायची. तिच्याचकडे आमचे हट्ट चालायचे. मी ऐकत नाही असं पाहून ती म्हणाली, ‘तू आता झोप. रात्री आभाळातून एक माणूस तुझ्यासाठी कपडे घेऊन येणार आहे. सकाळी तुझ्या उशाशी तुला दिसतील.’ आणि त्या रात्री एका सांताक्लॉजचं स्वप्न मी उराशी घेऊन झोपलो आणि खरोखरंच एक वृद्ध दाढीधारी खाली उतरला आणि माझ्या हातात कपडे देऊन गेला. नव्या कपड्यांचा एक विशिष्ट वास असतो. तो वास हुंगतानाच मला सकाळी जाग आली तेव्हा माझ्या उशाशी माझी वृद्ध आजी रडत असलेली मला दिसली. कारण काय तर आमच्या नात्यातला एक जण रात्रीच निवर्तला होता. म्हणजे त्या रात्री आभाळातून खरोखरच कुणी तर आला होता आणि आमच्यातल्या एकाला घेऊन गेला होता.
वपु, आज इतक्या वर्षांनी त्या सांताक्लॉजची आठवण झाली ती तुम्ही पाठविलेल्या भेटीमुळे. तुमच्या कथेतला ‘भदे’ नावाचा इसम लोकांच्या व्यथा, दु:ख, वेदना काही काळासाठी उसनी ठेवतो म्हणे! कालप्रवाहात वाहून गेलेली माझ्या वयाची सव्वीस वर्षे ठेवील का तो उसनी? फक्त एक दिवस?
तसं झालंच तर हा छायाचित्रकार वय वर्षे पाच फक्त, तुमच्याकडून येणार्या सांताक्लॉजची पुन्हा एकदा वाट पाहील..’
या पत्राला वपुंचं उत्तर आलं नाही. त्यांच्या ‘भदे’ला इतकी वर्षे उसनी ठेवणं शक्य झालं नसावं; पण वपुंचा सांताक्लॉज पिच्छा सोडायला तयार नव्हता! दुसर्या दिवशी ख्रिसमस नसतानाही एका टळटळीत दुपारी माझ्या ऑफिसला तो आला. ‘मला वपु काळेंनी पाठविलंय’ म्हणाला. त्याच्या हातात देखणी स्कायबॅग होती. ती माझ्या हातात कोंबून तो स्कूटरला किक मारून गेलासुद्धा! पुढं कळलं की हा सांताक्लॉज बँक ऑफ इंडियात नोकरीला आहे!
१९८७-८८ मध्ये केव्हातरी मित्रवर्य ह. मो. मराठे यांच्याबरोबर एक संपूर्ण दिवस वपु काळे यांच्या साहित्य सहवासात होतो. दिवसभर गप्पा, पेटीवादन, व्हायोलिन वादन, सहभोजन. रात्री उशिरा आम्ही त्यांच्या ‘झपूर्झा’तून बाहेर पडलो. ‘पुण्यातही आपले मित्र आहेत’ असं ते त्यावेळी म्हणाले. मध्यंतरी संपर्क विरळ झाला. पुण्यात ते वारंवार यायचे; पण आमच्या भेटी होत होत्या असं नाही. केव्हा तरी त्यांचं एखादं पत्र यायचं. तेच देखणं अक्षर. कमी मजकूर. छोटी छोटी वाक्ये. मला फार अप्रूप वाटायचं, त्यांच्या भाषेचं. त्यांच्या छोट्या छोट्या वाक्यांचं. ह. मो. मराठे त्यांना ‘आसू-हासूचा खेळिया’ म्हणायचे.
२00१ मध्ये व. पु. काळे रोटरीच्या एका मोठय़ा कार्यक्रमाला येणार असल्याचं कळलं. मी त्या कार्यक्रमात आधीपासून सहभागी होतोच. ती तारीख होती २५ जून. कार्यक्रम संध्याकाळी होता. दुपारपासूनच पावसाची रिपरिप होती. वपु येणार केव्हा, उतरणार कोठे याची चोख व्यवस्था होती. पण त्याची मला माहिती नव्हती. नेहमीच्या वेषात वपु आले. तेवीस वर्षांपूर्वी माझ्यासाठी सांताक्लॉज बनून आलेला ‘वपु’ नावाचा खेळिया आज कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष बनून आले होते. त्यांनी जोरदार भाषण केलं. कथाकथनासारखाच त्यांचा सूर होता.
कार्यक्रम संपला. जेवणासाठी एका टेबलाशी ते बसले होते. मी त्यांच्याकडे गेलो. पुसट होत चाललेल्या भेटींचे, पत्रांचे काही संदर्भ त्यांना दिले. माझ्या ‘प्लेझर बॉक्स’मध्ये खूप दिवसांत तुमचं पत्र आलेलं नाही, असंही म्हणालो. वपु नुसतेच हसले, म्हणाले, ‘सर्वच गोष्टीतलं ‘प्लेझर’ आता हळूहळू पळायला लागलंय आणि आता ठरवलंय की, पळत्याच्या पाठीमागे फारसं लागायचं नाही’ हे ऐकताना मनात चर्र्र झालं.
‘वपु, सध्या नवीन काय चाललंय?’
‘दोन पाहुणे कायमचे राहायला आले. त्यांची बडदास्त ठेवण्यातच बराच वेळ खर्च होतो. एकाचं नाव ‘ब्लडप्रेशर’, दुसरा ‘डायबिटीस’. दोघंही डँबिस आहेत.’
‘दुसरा डँबिस जरा काबूत ठेवा.’ मी म्हणालो.
‘ते आता शक्य नाही. त्या दोघांच्याच काबूत सध्या मी आहे. ते म्हणतील तेव्हा मुकाट्यानं त्यांच्याबरोबर जायचं.’
आणि २६ जून २00१ ला मध्यरात्री त्या दोघाही डँबिसांनी आपलं काम चोख केलं. ख्रिसमसच्या मध्यरात्री ज्या आभाळातून ते सांताक्लॉज खाली उतरतात तिथंच हे डँबिस ‘वपु काळे’ नावाच्या एका सांताक्लॉजला घेऊन गेले..
सौजन्य - मराठी याहू
0 comments:
Post a Comment