काही लेखक असे असतात की ज्यांच्या लिखाणाला काळाची कुठलीही मर्यादा असू शकत नाही. वसंत पुरूषोत्तम काळे हे यापैकीच एक मोठं नाव. वपुंच्या लिखाणाचे जगभरात लाखो चाहते आहेत. सोशल नेटवर्किंग साइट्वरही त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढतच असून त्यात तरुणाईची संख्या खूप मोठी आहे.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, ब्लॉग सारख्या प्लॅटफॉर्मही सध्या वपुर्झामय झाले आहेत. मराठीतल्या अनेक लेखकांच्या नावे फेसबुकवर पेजेस आहेत. पु.ल. देशपांडे यांच्यापासून व.पु.काळे यांच्यापर्यंत अनेकांची पेजेस फेसबुकवर आहेत. आताच्या तरुणाईमध्येही व.पु. काळे यांच्या लिखाणाची क्रेझ कायम आहे.
'वपुं'चं साहित्य ब्लॉगवर आणि डिजिटल मीडियावर अनेक वर्षांपासून आहे. पण फेसबुकवर गेल्या वर्षभरापासून 'वपुं'ची पेजेस दिसतायत. आजच्या घडीला फेसबुकवर 'वपुं'ची तीन पेजेस आहेत. त्यापैकी वसंत पुरुषोत्तम काळे आणि व.पु. काळे या नावाने दोन पेजेस आहेत. या पेजेला हजारोच्या संख्येने लाइक्स आहेत. या पेजेसवर 'वपुं'ची प्रसिद्ध वाक्यं घेऊन त्याचे पिक्चरमेसेजेस बनवले जातात. तसंच ते स्टेटस स्वरुपात शेअर होतात. हाच मजकूर कॉपी करुन व्हॉट्सअॅपवर शेअर केला जात आहे.
व.पु.काळे या नावाने गुगल प्लेवर अँड्रॉइड अॅप्लिकेशन उपलब्ध असलं तरी अनेकांना या अॅपबद्दल माहित नाही. जेमतेम ३५० लोकांनी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं असून ६० टक्क्यांहून अधिक लोकांनी या अॅपला फाईव्ह स्टार रेटिंग दिलं आहे. या अॅपवर वपुंचे दीडशेहून अधिक कोट्स आहेत. या अॅपमध्ये तुम्हाला तीन वेगवेळे फॉण्ट सिलेक्ट करता येतात.
फेसबुकवरील काही पेजेस लाइक्स
वसंत पुरुषोत्तम काळे ५९, ४७६
व.पु. काळे ९, ९५६
वसंत पुरुषोत्तम काळे (व.पु.काळे) ५००
आम्ही वपुंच्या प्रेमात
आम्ही 'वपुं'च्या लेखनाच्या प्रेमात आहोत. वपु मोजक्या शब्दात खूप काही सांगून जातात. मात्र सर्वांपर्यंत हे लेखन पोहोचत नाही. म्हणूनच आम्ही वर्षभरापूर्वी फेसबुकवर हे पेज सुरु केलं. आम्हाला खूप कमी वेळात बरीच प्रसिद्धी मिळाली. नॉन पेड प्रमोशनने आम्ही आज ६० हजारांचा पल्ला गाठला आहे. लोकांना नव्या माध्यमातून चांगलं लेखन दिल्यास त्यांना ते आवडतं. आज आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- प्रशांत पवार
( अॅडमिन, वसंत पुरुषोत्तम काळे फेसबुक पेज )
*स्वप्निल घंगाळे
सौजन्य- महाराष्ट्र टाईम्स
0 comments:
Post a Comment