ही कथा आहे,
मुंबईतल्या एका चाळीत अतिसामान्य जीवन व्यतित करत केमिस्टच्या दुकानात काम करणा-या श्री ची. त्याच्या
कुटूंबात त्याची आई,भाऊ अरविंद,वहिनी मनोरमा अन त्यांचा
मुलगा रंजन असे सदस्य असतात. अरविंदच्या
लग्नानंतर, श्री रात्रीचे झोपायला
त्याच्या एका मित्राकडे,’ पार्टनर ’
कडे जात असतो.जात असतो म्हणण्यापेक्षा त्याची अन आईची
पाठवणी चाळीतल्याच एका बि-हाडात ,अरविंद अन मनोरमेने स्वत:च्या प्रायव्हसीसाठी केलेली असते. हा श्री चा पार्टनर पुढे श्रीच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार बनतो.कधी प्रत्यक्ष भेटीतून तर कधी पत्राद्वारे त्यांचे संभाषण चालु राहते अन त्यामुळेच लग्नानंतर कधीच प्रत्यक्ष भेट न
होताही श्रीच्या बायकोसही तो नकोसा वाटत असतो. तर अशा चाळीतल्या जीवनामुळे नव्यानं उभ्या राहणा-या इमारतींविषयी श्री ला खुप आकर्षण असतं. अशा इमारतींविषयी त्याचे असलेले विचार मी
पुढेच ’ ह्या कादंबरीतले काही
लक्षात राहणारे संवाद ’ ह्या पोस्ट मध्ये दिले
आहेत. तिथे दमयंती जोशी ह्या
आपल्या मैत्रिणीबरोबर आलेली किरण वर्तक श्री ला दिसते.पण,तिथे त्यांची ओळख
होत नाही.ही सौंदर्यवती नक्कीच धनिक असेल असे मानत तो फक्त तिचे सौंदर्य डोळ्यांत भरुन घरी परततो. पुढे जेव्हा ती ,तो काम करत असलेल्या
केमिस्टच्या दुकानात येते तेव्हा त्यांची हळुहळू
ओळख होते.ओळख मैत्रीत परावर्तित होते अन आणखीन विलंब न करता श्री, किरणला तिच्याविषयी मनात
आलेले प्रेमळ विचार स्पष्टपणे सांगून परत न
भेटण्याविषयी सांगतो.कारण,त्याच्या मते तो
एक गरीब सामान्य तरुण असतो अन किरणची आर्थिक
परिस्थिती जरी खुप चांगली नसली तरी तिच्या सौंदर्यावर भाळून
तिला कुणीही चांगला श्रीमंत मुलगा सहज लग्नासाठी मागणी घालेल ह्याची त्याला खात्री असते आणि किरणला विसरण्यासाठी तिने त्याला न दिसणं हे त्याला खुप गरजेचे असते.पण,किरण मात्र त्याच्या ह्याच सरळ,सच्च्या स्वभावावर भाळून त्याच्याशी लग्न करायची इच्छा
बोलून दाखवते. यथावशकाश हा प्रेमविवाह
पार पडतो.किरण देखील नोकरी करत असते त्यामुळे ते लवकरच तिचीच मैत्रीण दमयंतीचा ब्लॉक
घेतात,दमयंती भारताबाहेर चाललेली असल्याने ती किरणला स्वत:चे फर्निचरही देऊन टाकते. दरम्यान श्री ची आई,अरविंद,मनोरमा हे तिघेही हुंड्याशिवाय घरात आलेल्या किरणवर आधीच नाराज असतात.खरं तर अरविंद लहानपणापासून घरातला
लाडका मुलगा असल्याने श्री च्या वाटेला देखील नेहमीच दुय्यम
स्थान येत असतं.वडिलांच्या मृत्यूनंतर आई देखील अरविंद साठीच जास्त
जीव काढत असते.आणि श्री च्या लग्नानंतर तर किरणच्या
सौंदर्यावर मनोरमा जळून असते.किरणचे वागणे त्या
तिघांना नेहमीच खटकत असते.पण,लहान रंजनचे
मात्र श्री काकाशी खुप पटत असते. किरणला श्री च्या घरातली परिस्थिती लक्षात यायला वेळ लागत नाही पण श्री त्यांना फारसा विरोध करत नसल्याने अन किरणलाही ह्या
गोष्टींकडे दुर्लक्ष कर असे सांगत असल्याने
तिचे अन श्री चे मधून मधून खटके उडायला सुरुवात होते. तरीही,त्यांचा संसार
तसा नीट चाललेला असतो.पण,बाळाच्या
आगमनानंतर मात्र श्री अन किरण एकमेकांना
पती-पत्नी म्हणुन दुरावतात. अन पुढे तर ह्या
सर्व गोष्टी इतक्या टोकाला पोहचतात की,श्री रागाच्या भरात एक अक्षम्य अपराध करुन बसतो. तो गुन्हा कोणता? श्री च्या घरचे
त्यांच्याशी परत नीट वागतात का ? किरण अन श्री लग्नाआधी एकमेकांवर असलेले सच्चे प्रेम परत मिळवतात
का ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हांला ’पार्टनर’ ही कादंबरी वाचावीच लागेल. ह्या कादंबरीचा
प्रकाशनकाल आहे १९७६ तरीही ती आजच्या पिढीच्या मनाशी नातं जोडते खिळवून ठेवणारी कथा,ओघवती भाषा,उत्कॄष्ट संवाद,पात्रांचा
त्यांच्या विचारांचा, जडणघडणीच्या
दृष्टीने विस्तॄत परिचय ही ह्या कादंबरीची काही वैशिष्ट्ये म्हणता येतील. मला ही कादंबरी
म्हणजे एका 'पुरुष' मनात ’उतरुन’ केलेला प्रवास वाटतो, निव्वळ समांतर रस्त्याने बघत चालत जात नाही.आयुष्यातल्या
प्रत्येक घटनेची, माणसांची
कथानायकाच्या मनावर उमटलेली शब्दछाप ह्या कथेत वाचायला मिळते. कथेचा शेवट मात्र
चटका लावून जातो हे खरं. मनाने सच्च्या, सहनशील, संवेदनशील असलेल्या श्री च्या हातून घडलेल्या गुन्ह्यामुळे तो एका
सुप्त ज्वालामुखी सारखा भासतो. तडजोडींचा, दाबलेल्या
भावनांचा लाव्हा साठून साठून त्यांचा स्फोट होतो. मग,तुलनात्मक दृष्ट्या श्री चा भाऊ अरविंद सारखी माणसं परवडतात,
जी हुशार नसली तरी काहीही
करुन रडतखडत का होईना एक सामान्य पण चांगले आयुष्य जगतात.त्यांच्यात तडजोडीचा,रागाचा लाव्हा
साठत नाही, त्याचा निचरा ते
रोज कुणालातरी स्वार्थासाठी फसवत,कुरबुरी करत बाहेर फेकून देतात. मला वाटतं,खरं तर आपण सारेचजण अशा ’पार्टनर” च्या शोधात असतो. जो नि:स्वार्थपणे आपल्याला
मदत करेल,आपली दु:ख-वेदना जाणून घेईल, त्यांवर उपाय सांगेल. जो आपल्या पासून एका हाकेच्या अंतरावर असेल. ज्याच्याशी बोलल्यावर मन
हलकं होईल...
आपल्यापैकी काहींना असा पार्टनर मित्र,मैत्रिणींच्या रुपात भेटतो तर काहींना लाइफ पार्टनरच्या रुपात....
आपल्यापैकी काहींना असा पार्टनर मित्र,मैत्रिणींच्या रुपात भेटतो तर काहींना लाइफ पार्टनरच्या रुपात....
0 comments:
Post a Comment